Crime NewsLatest NewsMaharashtraSangli

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट; दोन जण गंभीर जखमी

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात असलेल्या फटाके कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शोभेच्या दारूचा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, स्फोट इतका शक्तिशाली होता की भाळवणीसह आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात जमीन हादरल्याची माहिती आहे.

या स्फोटामुळे परिसरातील घरांच्या काचांना तडे गेले असून, काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दुर्घटनेत आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दरम्यान, हा फटाके कारखाना अधिकृत परवानगीने सुरू होता की नाही, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button