ठाण्यातील पडघा गावात ईडीची मोठी कारवाई; 9 कोटींची रोकड व सोनं जप्त, ISIS मॉड्युलशी संबंध उघड

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा या छोट्याशा गावातून सक्तवसुली संचालनालयाला (ED) तब्बल 9 कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं आहे. या कारवाईत 3 कोटी 70 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं असून, या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ईडीकडून करण्यात आलेल्या तपासात हे संपूर्ण प्रकरण ISIS च्या पडघा–बोरीवली मॉड्युलशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक राखीव जंगलातून खैर लाकूड बेकायदेशीरपणे तोडून त्याची तस्करी करण्यात येत होती आणि त्यातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे.
देशभरात एकाच वेळी छापे
या मनी लॉण्डरिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडीने गुरुवारी पडघा-बोरीवलीसह दिल्ली, कोलकाता, हजारीबाग (झारखंड) आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईनंतर 25 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर रोजी पडघा आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
खैर तस्करीचं मोठं रॅकेट उघड
तपासात असं समोर आलं आहे की, खैर झाडांपासून तयार होणारा ‘कात’ आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो, आणि त्याची अवैध तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा उभारला जात होता. या कातची खरेदी करणाऱ्या कंपन्यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. छाप्यांमध्ये जप्त करण्यात आलेलं खैर लाकूड वनविभागाकडे सुपुर्द करण्यात आलं आहे.
साकिब नाचनचा दहशतवादी कनेक्शन
पडघा गाव ISIS संदर्भात चर्चेत येण्याचं प्रमुख कारण म्हणजे साकिब नाचन. तो पडघा-बोरीवलीचा रहिवासी असून, या मॉड्युलचा स्वयंघोषित नेता मानला जात होता. तो यापूर्वी SIMI संघटनेशी संबंधित होता आणि 2002-03 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 2023 मध्ये त्याला अटक केली होती. जून 2025 मध्ये त्याचा मृत्यू झाला. NIA च्या तपासानुसार, नाचन आणि त्याच्या साथीदारांनी पडघा गावाला ‘Liberated Zone’ घोषित करून त्याचं नाव ‘अल शाम (Al Sham)’ ठेवलं होतं. येथून कट्टर विचारसरणीचा प्रसार, युवकांचं ब्रेनवॉश आणि संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती.
तपास अधिक तीव्र
ISIS मॉड्युलमार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सोनं गोळा करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, या आर्थिक जाळ्यात अजून किती लोक सहभागी आहेत, याचा शोध घेण्यासाठी ईडी, NIA आणि ATS कडून संयुक्त तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.



