नगरपरिषद निवडणूक अनुषंगिक प्रशासकीय कामांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
अमरावती : अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती व नगरपरिषद कार्यालयांना भेट देऊन निवडणूक अनुषंगिक प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजांबाबत संबंधित सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंजनगाव सुर्जी व दर्यापूर या दोन्ही तालुक्यातील स्ट्रॉंगरूमची पाहणी केली. सर्व संबधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूकसंबंधी कामांचे काटेकोर नियोजन करून अनुषंगिक प्रशासकीय कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी यावेळी दिले.
दरम्यान या दौरा प्रवासात विभागीय आयुक्तांनी अंजनगावसुर्जी तालुक्यातील पानपिंपरीच्या शेतीची पाहणी करून त्याबाबतचे औषधीगुण स्थानिक शेतकऱ्यांकडून जाणून घेतले. तसेच वलगाव येथे पुनर्वसन होणाऱ्या गांवाच्या जागेची पाहणी सुद्धा विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.



