Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

बिबट्या हल्ल्यांवरून विधानभवनात अनोखे आंदोलन; आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात अधिवेशनात दाखल

महाराष्ट्रात वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आज एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. जुन्नरमधील बिबट्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अपक्ष आमदार शरद सोनवणे हे बिबट्याच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचले. या अनोख्या आंदोलनामुळे अधिवेशनात काही काळ खळबळ उडाली.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः जुन्नर भागात बिबट्या संवेदनशील परिस्थिती अधिक तीव्र झाली असून आजवर तब्बल ५५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागासोबतच काही ठिकाणी बिबट्यांचा शहरी भागात घुसखोरीचा धोकाही वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

विधानभवन परिसरात बिबट्याच्या वेशात उपस्थित राहून आमदार सोनवणे यांनी सरकारकडे ठाम मागणी केली की, बिबट्यांचे नर–मादी वेगळे ठेवण्यासाठी आणि योग्य व्यवस्थापनासाठी किमान ८०० कोटी रुपयांची तरतूद करावी. योग्य नियोजनाअभावी बिबट्यांची प्रजनन प्रक्रिया वाढत असून परिणामी हल्ल्यांची संख्या वाढत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

सोनवणे यांनी सांगितले की, मागील ३–४ वर्षांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून ते ही समस्या सरकारसमोर मांडत आहेत; मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

दरम्यान, सभागृहात चर्चेदरम्यान वनमंत्र्यांनी बिबट्यांच्या हालचाली थांबवण्यासाठी जंगलात एक कोटीच्या शेळ्या सोडण्याच्या मुद्द्याचाही उल्लेख केला. या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिसाद दिला गेला असून या विषयावर आणखी चर्चा सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button