Crime NewsLatest NewsYavatmal

यवतमाळमध्ये नायलॉन मांजावरील पोलिसांची धडक कारवाई; २६ बंडल जप्त, एकाला अटक

यवतमाळ शहरात नायलॉन आणि गोल्ड मांजाच्या बेकायदेशीर विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित मांजाचे २६ बंडल जप्त करून पोलिसांनी या धंद्यावर मोठा आघात केला आहे.

नायलॉन मांजामुळे नागरीक आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. राज्य शासनाने यावर बंदी घातली असतानाही काही दुकाने गुप्तपणे विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर एलसीबी पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून मारवाडी चौकातील कृष्णकुमार उर्फ बंटी सिओटिया यांच्या दुकानावर तपासणी मोहीम राबवली.

तपासणीदरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांजा ठेवण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी १३ बंडल गोल्ड मांजा आणि १३ नायलॉन मांजा असे एकूण २६ बंडल, अंदाजे १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी बंटीला अटक करून पुढील तपासासाठी यवतमाळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

नायलॉन मांजा कायद्याने बंदीस्त असून त्याचा वापर गंभीर अपघातांना कारणीभूत ठरतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. बेकायदेशीर विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनीष गावंडे, उपनिरीक्षक गजानन राजमलू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button