ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळविणा-या चमूंचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार

अमरावती (दि.03.12.2025) – छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात पार पडलेल्या 39 व्या आंतर विद्यापीठ मध्य विभाग युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ पटकाविली. या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विजयी कलावंत आणि मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात चेन्नई येथे होणा-या राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवातही विद्यापीठाचा संघ आपली विजयाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला.
40 वर्षांच्या इतिहासातील सुवर्णक्षण
विद्यापीठाच्या 40 वर्षांच्या इतिहासामध्ये मध्य विभाग युवा महोत्सव स्पर्धेत अशी दर्जेदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपद मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले. स्पर्धेपूर्वी डॉ. निखिलेश नलोडे यांनी विद्यापीठ प्रमुख विजेता ठरेल, असे भाष्य केले होते आणि विद्याथ्र्यांच्या टीमवर्क व मेहनतीच्या जोरावर हे भविष्य खरे ठरले. कुलगुरूंनी विद्याथ्र्यांच्या ‘डेडिकेशन, प्लॅनिंग आणि डिसिप्लिन’चे कौतुक केले. ते म्हणाले, “हा अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे. मातीच्या कणांचे मोती झाले, एक-एक मोती एकत्र आले आणि आज मोत्याची माळ गळ्यात पडली आहे.” विद्याथ्र्यांनी आपल्या मनोगतातून ‘मी’ पासून ‘आम्ही’ पर्यंतचा सांगितलेला प्रवास विद्यापीठाच्या सांघिक भावनेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कलावंत आणि मार्गदर्शकांचे मनोगत
कलावंत प्रणव कोरे म्हणाला, “प्रशिक्षकांनी दिलेले उत्कृष्ट प्रशिक्षण आणि स्पर्धकांनी घेतलेले परिश्रम यामुळेच हे यश शक्य झाले.” पूर्वा मानकर म्हणाली, “मला मेडल आणि चॅम्पियन ट्रॉफी आणायचीच आहे, हे ध्येय डोळ्यासमोर होते. आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.” प्रशिक्षक डॉ. निखिलेश नलोडे म्हणाले, “कला ही आमची फॅमिली आहे. आम्ही शिस्त ठेवून सराव केला आणि वेळोवेळी इंटरनॅशनल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतले, ज्याचा खूप फायदा झाला. राष्ट्रीय स्तरावरही विद्यापीठ प्रबळ दावेदार असल्याचा दावा त्यांनी याप्रसंगी केला.
विजेत्यांची दिमाखात मिरवणूक
विजेत्या चमूचे आगमन होताच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून संविधान शिल्पापर्यंत ट्रॉफीसह त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सर्व कलावंत व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. या सत्कार समारंभास व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. राजीव बोरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार चमू व्यवस्थापक डॉ. शितल तायडे यांनी मानले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, डॉ. कु. मनिषा कोडापे, डॉ. व्ही.एच. नागरे, डॉ. एच.आर. देशमुख, डॉ. अरुण हरणे, श्री एम.एम. अंधारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, प्राचार्य डॉ. विजय भांगडिया तसेच प्रशिक्षक, व्यवस्थापक, सर्व विजेते कलावंत विद्यार्थी, विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



