electionLatest NewsMaharashtra Politics

मतमोजणी रद्द केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज – “ही पद्धत योग्य नाही”

नागपूर : हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची होणारी मतमोजणी रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता उर्वरित मतदान 20 डिसेंबरला झाल्यानंतर 21 डिसेंबर रोजी एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी अद्याप संपूर्ण निकाल वाचलेला नाही. मात्र, खंडपीठाने दिलेला निर्णय स्वायत्त असल्याने तो आम्हाला मान्य करावा लागेल. तरीदेखील, गेल्या 25 ते 30 वर्षांत मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे, पण चालू निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारे मतमोजणी पुढे ढकलण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. ही पद्धत योग्य वाटत नाही.”

उमेदवारांचा भ्रमनिरास – फडणवीस

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “जे उमेदवार दिवसेंदिवस मेहनत करून प्रचार करतात, त्यांचा अशा निर्णयामुळे मोठा भ्रमनिरास होतो. उमेदवारांची कोणतीही चूक नसताना, केवळ यंत्रणेच्या अपयशामुळे अशा प्रकारे गोष्टी घडणं योग्य नाही. निवडणूक आयोग यावर जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या प्रक्रियेत सुधारणा करावी, जेणेकरून पुढील निवडणुकांमध्ये असे प्रकार होणार नाहीत.”

कायद्याचा चुकीचा अर्थ लावला – मुख्यमंत्री

फडणवीस यांनी कायद्याच्या अर्थ लावण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “माझं वैयक्तिक मत आहे की या प्रकरणात कायद्याचं चुकीचं अर्थ लावण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत, हे मला माहित नाही, मात्र त्यांच्या सन्मान राखून सांगतो की अतिशय चुकीची व्याख्या झाली आहे. आम्हीही अनेक वर्षांपासून निवडणुका लढवत आहोत, आम्हालाही नियम माहिती आहेत,” असं ते म्हणाले.

24 ठिकाणांच्या निवडणुकीसाठी संपूर्ण मतमोजणी पुढे ढकलणं चुकीचं

फक्त 24 ठिकाणांवर निवडणुका होणार असल्यामुळे संपूर्ण मतमोजणी पुढे ढकलणं मला तरी योग्य वाटत नाही. कोणीतरी कोर्टात याचिका दाखल केली म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणं हे कोणत्याच तत्वात बसत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक नाराजी – निवडणूक आयोगावर नाही

“मी याप्रकरणी अधिक काही बोलणार नाही. मात्र ही माझी वैयक्तिक नाराजी आहे. ती निवडणूक आयोगावर नसून, या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेवर आहे,” असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button