AmravatiLatest News

संवैधानिक मूल्यासमोरील आव्हाने आपल्यालाच समर्थपणे परतवावी लागतील – प्रा. श्रीकिशन मोरे

विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्रातर्फे व्याख्यान संपन्न

अमरावती (दि.27.11.2025)-  संवैधानिक मूल्यासमोर आजघडीला अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत, मात्र ही आपल्यालाच समर्थपणे परतवावी लागतील, असे आवाहनात्मक प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी येथे केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित ‘संवैधानिक मूल्यांसमोरील 21 व्या शतकातील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, सामाजिक कार्यकर्ते श्री सुदर्शन गांग, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
               प्रा. मोरे विषयाची मांडणी करतांना म्हणाले की, सामाजिक क्रांतीचे स्वप्न संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी पूर्ण केले. लोकशाही, समाजवाद, सार्वभौम आणि प्रजासत्ताक ही मूल्ये संविधानाने देशवासियांना दिली आहेत. लोकशाहीच्या प्रतिष्ठेला प्रवर्तीत करणारी बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत होती. दुसरीकडे पं. जवाहरलाल नेहरू यांना लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्य हवी होती. 42 व्या घटनादुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता ही तत्वे आणली  गेली. परंतु धर्मधिष्ठतेचे  आपल्यासमोर मोठे आव्हान असून भविष्यात भारताला पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागेल की काय, अशी भीती सुध्दा वक्ते प्रा. मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
               सामाजिक, राजकीय, आर्थिक लोकशाहीसाठी डॉ. बाबासाहेबांनी संसदीय लोकशाही रुजविली. परंतु आता स्थिर सरकारचाही धोका जाणवत असल्याचे मत त्यांनी मांडले. संवैधानिक पध्दतीने नियंत्रणाबाहेर ठेवण्यात आलेल्या निवडणूक आयोगाचे पावित्र्य जपण्याचे आव्हानही आपल्यापुढे आहे. 25 नोव्हेंबर, 1949 च्या भाषणात डॉ. बाबासाहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, ते आज तंतोतंत जुळत असल्याचे सांगून ज्या दिवशी राष्ट्रापेक्षा विचार वरचढ ठरेल, तो दिवस स्वातंत्र्याचा नसेल, असेही प्रा. श्रीकिशन मोरे म्हणाले.
                जागतिकीकरण, खाजगीकरणाची आव्हाने उभी असतांना धर्मनिरपेक्षता जोपासणे ही काळाची गरज झाली आहे. देशाची एकात्मता, अखंडता कायम राखण्यासाठी समानता व बंधुता या महत्वाच्या बाबी असून त्यासाठी कायद्याची गरज असल्याचेही प्रा. मोरे यावेळी म्हणाले.
                प्रमुख अतिथी डॉ. नितीन कोळी म्हणाले, संसदीय क्षेत्रातील नेतेच जर संविधान बदलाची भाषा करीत असतील, तर ती चिंतेची बाब असल्याचे नमूद केले. डॉ. बाबासाहेबांनी भविष्याचा विचार करुनच संविधानात दुरुस्तीची सोय करुन ठेवली आहे. संविधान आपल्यासाठी किती व कसे उपयोगी आहे हे देखील आजच्या युवा पिढीला माहिती असणे आवश्यक आहे.संविधानाविषयी गैरसमज पसरविल्या जाता कामा नये. खरी वस्तुस्थिती युवकांनी माहित करुन घ्यावी, असे आवाहन डॉ. कोळी यांनी केले.
                अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, आपली नाळ संविधानाशी जुळलेली आहे. भारतात तीन हजार वर्षापूर्वीच लोकशाहीची रुजवात झाली होती. आपण आपल्या अधिकाराबाबत जागरुक असलेच पाहिजे, परंतु त्याचवेळी आपली जबाबादारी देखील आपण पार पाडली पाहिजे. आजच्या काळात नैतिक मूल्यांची होत असलेली ढासळण, इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चाललेली युवा पिढी हे समाजमूल्यांसमोरील मोठे आव्हान आहे. संविधानाचे महत्व अधोरेखित करतांना ते पुढे म्हणाले, संविधानाचा मूळ ढाचा कोणालाच बदलता येत नाही अशी मोठी तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करुन ठेवली आहे. अन्य देशांमध्ये होणारे अराजक आपल्या देशातील संवैधानिक प्रणालीमुळे होत नाही आणि पुढेही आपली अशीच वाटचाल राहील, असेही कुलगुरू म्हणाले.
                 संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, मेणबत्ती प्रज्वलित करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड यांनी, सूत्रसंचालन उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी, तर आभार प्रा. जगदीश गोवर्धन यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button