अमरावतीत घरफोडीचे प्रकरण २४ तासांत उलगडले; कारागृहातून सुटल्यावरच आरोपीने चोरी केली

अमरावती, २५ नोव्हेंबर २०२५ – अमरावती शहरातील फेजरपूरा पोलीस स्टेशन हद्दीत एका घरफोडीच्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी गगलानी नगरात राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांच्या घरात पितळी भांडे आणि घड्याळे चोरी झाल्याचे प्रकरण या घरफोडीसाठी संदर्भ ठरले.
फ्रेजरपूरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री, आरोपी राजेश उर्फ अजय गोवर्धन दांडगे (वय ३६, रा. तळणीपुर्णा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) यांनी महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांच्या बंद घरातून देवघरातील ११ नग तांब्या-पितळी भांडे आणि फॉस्ट्रक कंपनीचे जेंट्स घड्याळ असा एकूण १३,४५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता.
फिर्यादी महिलेचा पुतण्या ट्युशनवरून घरी जात असताना घराचा दरवाजा उघडल्याचे पाहिले. घरात जाऊन तिने चोरी झाल्याचे लक्षात आले. तत्काळ पोलिस पथक आरोपीच्या शोधात निघाले. २५ नोव्हेंबर सायंकाळी राहुल नगर परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे आरोपी २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कारागृहातून सुटला होता, आणि त्याच रात्री घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे की, आरोपीला बंद घर असल्याची माहिती कोणीतरी दिली असावी.
आरोपीवर अमरावती शहर व ग्रामीण पोलिसात घरफोडी आणि चोरीसह तब्बल डझनभर गुन्हे आधीच दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करून प्रकरण उघडकीस आणले आहे.
फ्रेजरपूरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट म्हणाले, “आमच्या तत्परतेमुळे घरफोडीचे प्रकरण २४ तासांत उलगडले गेले. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पोलिसांसोबत सहकार्य करणे आवश्यक आहे.”



