संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन; विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग


अमरावती, २६ नोव्हेंबर २०२५ – समाज कल्याण विभागाच्या ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत आज संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचा केंद्रबिंदू श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात ठेवण्यात आला, जिथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, तहसीलदार विजय लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, व्याख्याते प्रा. डॉ. राजेश मिरगे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विनय राऊत, माजी प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, समाज कल्याण अधिकारी एस. एस. बोबडे आणि विशेष अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले की, “२६ नोव्हेंबर हा दिवस फक्त एका पुस्तकाचा स्विकारण्याचा दिवस नाही, तर देशाच्या आत्म्याची, विचारांची आणि मूल्यांची पुनर्स्थापना करणारा दिवस आहे. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे, तर लाखो वंचितांच्या आशेचा दीपस्तंभ आहे, आणि त्याचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.”
प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी संविधानकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की, “त्यांना देशातील पारंपारिक विषमता मुलक मानसिकतेचे भान होते, म्हणूनच संविधानामध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केली गेली.” प्रा. डॉ. राजेश मिरगे यांनी संविधान दिन “केवळ स्मरणदिन नसून लोकशाहीचे आत्मपरीक्षण आणि वचनबद्ध होण्याचा दिवस आहे” असे सांगितले.
कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन झाले. जनजागृती अभियानाच्या संविधान चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला गेला. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले, श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले आणि समाज कल्याण अधिकारी सरिता बोबडे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग आणि प्रास्ताविक वाचनामुळे कार्यक्रम अत्यंत सफल ठरला.



