लातूर ZP शिक्षण विभागात खळबळ; निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांच्या लातूरमधील कारभाराची चौकशीची मागणी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मोठी हालचाल आणि खळबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्रभारी अधिकारी भगवान फुलारी यांच्या निलंबनानंतर आता त्यांच्या लातूरमधील कारभाराचीही चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी शिक्षक आणि पालकांकडून होत आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ शिंदे यांनी चार महिन्यांपूर्वी लातुरात रुजू झाला होता, तर त्याआधी काही काळ भगवान फुलारी यांच्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी होती. या दोन्ही अधिकाऱ्यांवर बीडमध्ये शिक्षणाधिकारी असताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.
यातच गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर आणि नागनाथ शिंदे यांच्यातील आक्षेपार्ह संभाषणाचा व्हिडिओ गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सर्व प्रकरणांनंतर 19 नोव्हेंबर रोजी दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
परंतु आता शिक्षक आणि पालकांकडून एक मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे – लातूरमध्ये या दोघांनी कारभार सांभाळताना कोणते व्यवहार केले? गैरव्यवहार झाले का? आणि त्याची तपासणी कधी होणार? काही शिक्षकांचे म्हणणे आहे की अशा अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची भीती नाही, कारण “मागच्या दाराने” पैसा कमावून त्याचा रोब वाढवला जातो आणि बदलीही मनासारखी करून घेतली जाते.
“करोडो रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरीची काय गरज?” असा रास्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
आता या दोन्ही अधिकाऱ्यांच्या लातूरमधील कारभाराची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केशव गंभीरे आणि सुनीलकुमार हाके यांनी केली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील शिक्षण विभागात मोठी चर्चा सुरू आहे.



