अचलपूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर; रेखाबाई गड्रेल मैदानात

अचलपूर : अचलपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज महत्त्वाचा निर्णय घेतला असून रेखाबाई जियालाल गड्रेल यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.
उमेदवारी जाहीर करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, अमरावती जिल्हा सहसंपर्कप्रमुख श्यामभाऊ देशमुख, जिल्हाप्रमुख ॲड. ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल, जिल्हाप्रमुख संतोष बद्रे, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख वर्षा भोयर, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रितेश अवघड, शिवसेना परतवाडा शहरप्रमुख विलास सोळंकी यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी रेखाबाई गड्रेल यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. अचलपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरून विजय मिळवेल, असा विश्वास जिल्हा नेतृत्वाने व्यक्त केला.
या घोषणेनंतर अचलपूरमध्ये राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले असून निवडणुकीत शिवसेनेने जोरदार प्रवेश केला आहे.



