Latest NewsMaharashtra

बालभिक्षेकरी पकड मोहीम सुरू — शहरातील वाढत्या घटनांवर जिल्हा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

अमरावती, दि. ४ नोव्हेंबर :
शहरात वाढत्या बालभिक्षेच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, पोलिस विभाग, महानगरपालिका व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी १० वाजता राजकमल चौक आणि श्याम चौक परिसरात करण्यात आला. पुढील काही दिवसांत शहरातील इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी चौक तसेच इतर गर्दीच्या भागात अशीच तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोहिमेदरम्यान भीक मागणाऱ्या बालकांची सुटका करण्यात आली असून, त्यांना तात्काळ बाल कल्याण समितीसमोर (CWC) हजर करून काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणी व समुपदेशनाची प्रक्रिया सुरू असून, संबंधित पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. अजय डबले, समुपदेशक श्री. आकाश बरवट, महिला व बालविकास विभाग (मनपा) प्रतिनिधी श्री. हिवराळे, शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रतिनिधी श्री. राजेश नाईक, तसेच चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक श्री. पंकज शिंगारे, समुपदेशक श्रीमती मीरा राजगुरे, सुपरवायझर श्रीमती सरिता राऊत, श्री. सर्वोदय जेवणे, केस वर्कर अभिजीत ठाकरे आणि छाया मुकाडे, तसेच सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे कर्मचारी निकिता चव्हाण, शिवराज पवार, युसुफ खान आणि नारायण कवडे उपस्थित होते.

नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, बालकांना भीक देऊ नये. शहरातील प्रमुख चौकांमध्ये जनजागृतीसाठी “मुलांना भीक देऊ नका” असे बॅनर लावण्यात आले आहेत. बालभिक्षेकरी आढळल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्ष, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड हेल्पलाईन – १०९८ वर त्वरित संपर्क साधावा.

या मोहिमेमुळे शहरातील बालभिक्षेकरी प्रकरणांवर आळा बसण्यास मदत होणार असून, पुढील काही दिवस सातत्याने अशा मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. अजय डबले यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button