प्रेमसंबंधातून तरुणाचा घेतला जीव, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील घटना

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे २१ वर्षीय विष्णूकांत पांचाळ या तरुणाची क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. विष्णूकांत याचे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील नागमप्पली गावातील विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाचा राग आल्याने संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी आरोपींनी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावून घेतले. त्यानंतर गजानन आणि अशोक यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनी संगनमत करून विष्णूकांतचे हातपाय बांधले आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार केले. मारहाणी दरम्यान त्याच्या शरीरावर गरम चटके देऊन छळ करण्यात आला. या निर्दयी अत्याचारामुळे तो गंभीर जखमी झाला.
गंभीर अवस्थेत विष्णूकांतला उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच २२ ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या क्रूर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



