‘एक दिवा बळीराजासाठी’| नांदेडमध्ये मरळक येथील विमलेश्वर मंदिर ५००० दिव्यांनी उजळले |

नांदेड – नांदेड, मराठवाड्याच्या या भागामध्ये काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर, नांदेड जिल्ह्यातील मरळक येथे एक स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावडे यांनी ‘एक दिवा बळीराजासाठी’ हा उपक्रम आयोजित केला
मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात तब्बल ५ हजार दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. या उपक्रमात गावातील महिला-पुरुषांनी एकत्र येत दिव्यांच्या माध्यमातून स्वास्तिक आणि ‘ओम’ चे सुंदर आकार साकारले. दिव्यांच्या या तेजाने संपूर्ण मंदिर परिसर जणू काही प्रकाशात न्हाऊन निघाला.
यावेळी विमलेश्वर महादेवाची विधिवत आरती करण्यात आली. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीतून शेतकऱ्याला सावरण्यासाठी, त्याला नैसर्गिक संकटातून उभारी मिळवून देण्यासाठी महादेवाला साकडं घालण्यात आलं. संकटकाळात शेतकऱ्याच्या जीवनात पुन्हा आनंद आणि प्रकाश यावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.



