अमरावती पोलिसांची मोठी कारवाई: २.८८ लाखांचा चोरीचा माल जप्त, ३ आरोपी आणि १ अल्पवयीन बालक ताब्यात

अमरावती शहर पोलिसांनी केलेल्या एका विशेष कारवाईत, गाडगेनगर पोलीस स्टेशनमधील चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रजनी मंगल कार्यालयाजवळ एका ऑटोतून १,१०,०००/- रुपये किमतीचा २२० किलो वजनाचा चोरीचा मुद्देमाल (पाईप्स आणि अँगल) जप्त केला.
मा.पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार, अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्हेगारांवर विशेष पाळत ठेवली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यासाठी गुप्त बातमीदार नेमले होते. दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल एका ऑटोमधून विकला जाणार आहे. ही विक्री कर्तव्य लॉन परिसरातील रजनी मंगल कार्यालयासमोर होणार होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. तिथे त्यांना एम.एच-२७-बी.डब्ल्यु-२३७५ क्रमांकाची एक ऑटो उभी दिसली. त्या ऑटोमध्ये असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्यांनी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी, ५९ नग अॅल्युमिनियमचे स्क्वेअर पाईप्स, २८ नग काळ्या रंगाचे अॅल्युमिनियमचे अँगल, आणि १६ नग फोर-वे अँगल असा एकूण १,१०,०००/- रुपये किमतीचा सुमारे २२० किलो वजनाचा मुद्देमाल जप्त केला. याव्यतिरिक्त, गुन्ह्यात वापरलेली ऑटो आणि आरोपींच्या ताब्यातून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण २,८८,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत: १. अहेफाज खान एजाज खान, २१ वर्ष (ऑटो चालक) २. शेख इमरान शेख सादीक, २३ वर्ष ३. अयान खान इमरान खान, १९ वर्ष ४. एक विधी संघर्षग्रस्त बालक ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस आयुक्त अरविंद चावरिया साहेब, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, गणेश शिंदे साहेब, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अमरावती शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे, एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस करत असलेल्या प्रयत्नांमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होत आहे.



