इतवारा बाजारातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; दोन ट्रक साहित्य जप्त

अमरावती : महानगरपालिका अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाने संयुक्तपणे बुधवारी इतवारा बाजार परिसरात मोठी अतिक्रमणांवर मोहीम राबवली. परिसरातील व्यापाऱ्यांनी सार्वजनिक नाल्यांवर केलेल्या शेड, काँक्रीट सिमेंटच्या रपट्या व लोखंडी खोके यांसारख्या अतिक्रमणांमुळे नाली सफाईस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सार्वजनिक नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येण्याची वेळ येत होती.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत करण्यात आली. जे.सी.बी. मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यात आले.
सदर कारवाईमध्ये झोन क्रमांक १ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, झोन क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, स्वच्छता निरीक्षक सचिन सैनी, पोलीस कर्मचारी व इतर विभागीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
या मोहिमेदरम्यान दोन ट्रक भरून अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.



