अमरावती महानगरपालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट व ‘अमृत अंबानगरी’ उपक्रमांचे मा. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण
अमरावती : अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलाअंतर्गत व्हॉट्सअॅप चॅटबॉट व ‘अमृत अंबानगरी’ या उपक्रमांचे लोकार्पण मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, अमरावती जिल्हा यांच्या शुभहस्ते आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपन्न झाले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार प्रविण तायडे, आमदार केवलराम काळे, आमदार राजेश वानखेडे, आमदार गजानन लवटे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, विभागीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हॉट्सअॅप चॅटबॉट – नागरी सेवा आता थेट मोबाईलवर महानगरपालिकेने नागरिकांना घरबसल्या, सहज व तात्काळ सेवा पुरवण्यासाठी WhatsApp आधारित चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत, २४x७ उपलब्ध, आणि मराठी व इंग्रजी भाषांमध्ये वापरण्यास सुलभ आहे. या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर भरणा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे, तक्रार नोंदणी, पाणीपुरवठा, स्वच्छता सेवा, आपत्कालीन हेल्पलाईन्स व अन्य महत्त्वाच्या सुविधा मोबाईलवरच मिळणार आहेत.
‘अमृत अंबानगरी’ – एकात्मिक शहरी विकासाची दिशा ‘स्वच्छ, सुंदर, स्मार्ट’ अमरावती शहर घडवण्यासाठी महानगरपालिकेने ‘अमृत अंबानगरी’ हा बहुआयामी आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम सुरू केला आहे.
- या उपक्रमांतर्गत खालील चार प्रमुख उपमोहीमा राबवण्यात येणार आहेत:
- मिशन फ्री फुटपाथ – शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करणे
- स्वच्छ सुंदर अमरावती – घनकचरा व्यवस्थापन व सौंदर्यीकरण
- मिशन ग्रीन अमरावती – वृक्षारोपण, हरित पट्टे व पर्यावरण संवर्धन
- डिजिटल अमरावती – ई-गव्हर्नन्स व डिजिटल सेवा प्रणाली
या सर्व मोहिमा स्वतंत्र कृती आराखड्यांद्वारे पारदर्शकपणे राबवण्यात येणार असून, महिला बचतगट, शाळा, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात येईल.
‘अमृत अंबानगरी’ हे नाव एक शाश्वत, आधुनिक आणि समृद्ध अमरावतीचे प्रतीक आहे. या उपक्रमाची टॅगलाईन – ‘स्वच्छ, सुंदर, स्मार्ट’ ही शहराच्या नवनिर्माणाची दिशा दाखवते.
या प्रसंगी बोलतांना मा.पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
“अमरावती महानगरपालिकेचा चॅटबॉट आणि अमृत अंबानगरी उपक्रम हे फक्त सेवा सुविधा पुरवणं नव्हे, तर अमरावतीच्या सर्वांगीण परिवर्तनाची सुरुवात आहे. नागरी सेवा अधिक पारदर्शक, जबाबदार आणि डिजिटल स्वरूपात मिळणं ही काळाची गरज आहे आणि अमरावतीने यात आघाडी घेतली आहे.”
पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीकर नागरिकांना आवाहन केले की, “अमरावतीच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाची साथ अत्यावश्यक आहे. महानगरपालिकेने सुरु केलेल्या WhatsApp चॅटबॉट आणि ‘अमृत अंबानगरी’ या उपक्रमांचा उपयोग करून नागरिकांनी अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा. या उपक्रमांद्वारे आपण शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.”
“शहराच्या प्रत्येक घटकाने – महिला बचतगट, शाळा, युवक, व्यापारी, सामाजिक संस्था – यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमणमुक्ती यामध्ये सहभाग नोंदवावा.”
“ही फक्त शासकीय योजना नाही, तर आपल्या अमरावतीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची एक सामूहिक चळवळ आहे. चला, एकत्र येऊन अमरावती शहराला ‘Urban Transformation Leader’ बनवूया.”



