Amaravti GraminLatest News

चांदुर बाजार तालुक्यात दुबरा कपाशी पेरणी ने शेतकरी संकटात

चांदुर बाजार : चांदुर बाजार तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कपाशी, सोयाबीन आणि तूर आदी पिकांच्या पेरण्या सुरू केल्या होत्या. मात्र, 19 व 20 जूनच्या रात्री झालेल्या पावसानंतर पावसाने दांडी मारल्याने या भागात पुन्हा कोरडी पडलेली परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी दुबारा पेरणीच्या संकटात सापडले असून, लाखो रुपयांचे बी-बियाणे पाण्यात गेले आहे.

🌧️ पावसाने फिरवला पाठ, शेतकऱ्यांचे स्वप्न मातीत!
शेतकऱ्यांनी अनेकांनी कर्ज काढून, काहींनी दागिने गहाण ठेवून बी-बियाणे खरेदी केली होती. कपाशीच्या दर्जेदार व महागड्या बियाण्यांना पसंती देत पारंपरिक पद्धतीने बैलाच्या साहाय्याने पेरणीही केली. मात्र आता पावसाच्या अभावामुळे बी अंकुरले नाही, काही ठिकाणी उगवलेले पीक किड्यांनी किंवा वन्य जनावरांनी खाल्ले आहे.

📉 दुबार पेरणीचा भार, आत्महत्येचा धोका?
अगोदरच कर्जाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी आता पुन्हा दुबारा पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न घेऊन मानसिक तणावात आहे. अनेकांनी हे बियाणे कर्जावर घेतल्याने ही दुबार पेरणी आत्महत्येचे कारण ठरू शकते, अशी भिती स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.

🗣️ सरकारच्या उदासीनतेवर संताप
चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी म्हणतात की, “सरकार फक्त घोषणाच करत आहे, पण प्रत्यक्ष मदत कुठेच मिळत नाही.” वारंवार प्रहार संघटना आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी आणि मदतीसाठी आंदोलने होत आहेत, मात्र अजूनही सरकारने ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे “झोपलेल्या सरकारला जाग कधी येणार?” हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात गूंजत आहे.

📍 शासनाची तातडीची मदत आवश्यक
या संपूर्ण परिस्थितीवर शासन व कृषी विभागाने तातडीने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. दुबारा पेरणीसाठी मदतीचा विशेष निधी, बियाण्यांची मोफत उपलब्धता, वीज व सिंचन सुविधांसाठी सवलती देणे, या गोष्टींवर प्रशासनाने कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडेल, अशी तीव्र भावना चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रतिनिधी / सुयोग गोरले

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button