अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; ५० गावांत शेतीचे नुकसान

अमरावती : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर काही केल्या कमी होताना दिसत नाही. बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा शहरासह आठ तालुक्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ५० गावांमधील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, १६ गावांतील ९४ घरे कोसळली आहेत. काही ठिकाणी जनावरेही मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे.
या पावसामुळे २५५.५ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, कांदा, भाज्या, तीळ, टरबूज, केळी, आंबा, संत्री, भुईमूग आणि इतर हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १४ गावांमध्ये केळी, कांदा आणि ज्वारीचे अत्यंत गंभीर नुकसान झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
धारणी तालुक्यातील काही गावांमध्ये ११ गुरांचे मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हवामान खात्याने याचा इशारा दिला असला तरी अवकाळी पावसाचा तडाखा इतका जोरात बसणार, याची कल्पनाच नव्हती.
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
पिके हातात येण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातील पिके उद्ध्वस्त केली आहेत. फळबागा व भाजीपाला क्षेत्रातील पिकांची अतोनात हानी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आणि संतापाचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून पंचनामे सुरू
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित गावांमध्ये पाहणी केली असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी शासनाकडे अहवाल सादर केला जात असल्याचेही सूत्रांकडून समजते.



