चाईल्ड लाईनने रोखला बालविवाह, मुर्तिजापूरच्या माना गावातील घटना

अकोला – अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावात चाईल्ड लाईन आणि ‘अॅसेस टू जस्टीस’ प्रकल्प अंतर्गत धडक कारवाई करत बालविवाह थांबवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात चाईल्ड लाईनने तब्बल चार बालविवाह रोखल्याची नोंद घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी यवतमाळ जिल्ह्यातून लग्नासाठी मानाला आली होती. मात्र चाईल्ड लाईनचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचताच लग्नस्थळी उपस्थित असलेले सुमारे २०० वऱ्हाडी पाहुणे घाबरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड लाईन तर्फे तत्काळ प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये आणि अॅसेस टू जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज सुरोशी यांच्याशी समन्वय साधून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
मुलगा व मुलीच्या पालकांना कायद्याबाबत माहिती देण्यात आली असून त्यानंतर त्यांना अधिकृत नोटीसही देण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी विविध यंत्रणा एकत्र येऊन काम करत असल्याचा उल्लेख यावेळी अधिकाऱ्यांनी केला.
गेल्या आठवड्यात रोखण्यात आलेले बालविवाह – चिंतेची बाब
या प्रकरणामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अजूनही चिंतेचा विषय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र चाईल्ड लाईन व अन्य यंत्रणांची तत्परता आणि कारवाईमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे.



