citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात धारदार चाकूसह तरुणाला अटक; कुहीतील चोरीचा गुन्हाही उघडकीस!

पाचपावली पोलिसांची मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग परिसरात कारवाई; चाकू आणि ६९० रुपये असा १,२९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर, प्रतिनिधी : नागपूर शहरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पाचपावली पोलिसांनी धारदार चाकूसह ताब्यात घेतले आहे. प्रयत्नशील उर्फ चिकू देवानंद खोब्रागडे (वय १८, रा. लष्करीबाग, पाचपावली, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक धारदार लोखंडी चाकू आणि ६९० रुपये रोख असा एकूण १ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, आरोपीकडून जप्त करण्यात आलेले ६९० रुपये कुही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद समदुरे (बकल नंबर २९१०) आणि त्यांच्या पथकाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळील भोला स्कूलच्या मागे एका सार्वजनिक ठिकाणी संशयित तरुण आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक धारदार लोखंडी चाकू आढळून आला. आरोपी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

जप्त करण्यात आलेला चाकू सुमारे १६ इंच लांबीचा असून, त्याच्या पात्याची लांबी ११.५ इंच आहे. पात्यावर मराठीत ‘जोर’ असे कोरलेले असून, टोकाजवळ एका बाजूला काटेरी धार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या चाकूची अंदाजे किंमत ६०० रुपये आहे.

दरम्यान, आरोपीच्या लोअर पँटच्या खिशातून ६९० रुपये रोख रक्कमही मिळून आली. चौकशीदरम्यान ही रक्कम कुही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ५२१/२०२६ मधील चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष ही रक्कम जप्त केली. कुही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८८८/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद समदुरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे धारदार शस्त्र बाळगणाऱ्या संशयितावर कारवाई करण्यासोबतच कुही येथील चोरीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button