ऊसाला चार हजारांचा भाव द्या; दुष्काळग्रस्तांना हेक्टरी लाखाची मदत द्या!

बीडमध्ये शेतकरी आक्रमक; पाडळशिंगी येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, शेतकरी नेते रविराज साबळे पाटील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद
बीड : ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाडळशिंगी येथे शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेतकरी नेते रविराज साबळे पाटील आणि पोलिसांमध्ये भररस्त्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांसमोर हात जोडून, पाय पडून शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची विनंती करणाऱ्या शेतकरी नेत्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
ऊसाला योग्य भाव मिळावा आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी नेते रविराज साबळे पाटील आणि विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी तसेच परिसरातील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या रास्ता रोकोमुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. याचदरम्यान शेतकरी नेते रविराज साबळे पाटील आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. पोलिसांसमोर हात जोडून तसेच पाय पडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
या आंदोलनातून शेतकरी नेत्यांनी साखर कारखानदारांनाही थेट आवाहन केले. दिवाळीचे स्नेहभोजन करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर देण्याला प्राधान्य द्या, असे सांगत २६ तारखेच्या आत उसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव देण्याबाबत जाहीर घोषणा करावी, अशी मागणी रविराज साबळे पाटील यांनी केली.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने २६ तारखेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
आता प्रशासनाच्या बैठकीत ऊसदराचा प्रश्न मार्गी लागणार का? ऊस उत्पादकांना प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळणार का? तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर होणार का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



