
१४ किलो प्लास्टिक जप्त; एका प्रतिष्ठानाला ५ हजारांचा दंड, साईनगर व अकोली रोडवरील २० आस्थापनांची तपासणी
अमरावती, दि. १९ नोव्हेंबर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी आणि स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने साईनगर व अकोली रोड परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २० आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, सुमारे १४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका प्रतिष्ठानावर ५ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), स्वास्थ्य अधीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त, झोन क्रमांक ४ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने परिसरातील विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान बहुतांश आस्थापनांमध्ये कचरा संकलनासाठी डस्टबिनचा योग्य वापर होत असल्याचे आढळून आले. मात्र, साईपूजा सामग्री या प्रतिष्ठानात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित प्रतिष्ठानावर नियमानुसार ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. याच कारवाईदरम्यान अंदाजे १४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या पथकाने अन्य आस्थापनांनाही परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या. स्वच्छता नियमांचे पालन करण्याबाबत व्यावसायिकांना जागरूक करण्यात आले.
या विशेष मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, दिनेश निंदाने, सोपान माहुलकर, प्रवीण उसरे, प्रियंका बैस, सागर राजुरकर, वैभव खरड, सुमेध मेश्राम आणि मिथुन चावरे यांनी सहभाग घेतला.
शहरातील स्वच्छता राखणे, प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालणे आणि प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. महापालिकेकडून अशा तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिटी न्यूज | वस्तुस्थिती समाजहितासाठी!



