शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी नागपुरात अधिवेशनावर मोर्चा धडकणार

४ डिसेंबरला शेगावहून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात; ९ डिसेंबरला नागपुरात पोहोचणार – रोहित पवार यांची माहिती
नागपूर : विदर्भातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली. विदर्भातील पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या आंदोलनाची तयारी सुरू असून, ४ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ डिसेंबर रोजी नागपुरात अधिवेशनस्थळी धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची मदत जाहीर झाली; मात्र प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळालेली नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला. मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली सरसकट पुढील दोन वर्षांसाठी थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी केवळ राज्य सरकारचा आदेश पुरेसा नसून रिझर्व्ह बँकेनेच अधिकृत आदेश काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र रोजगार हमी योजना सुरू करण्याची मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
१९७२ चा दुष्काळ अत्यंत भीषण मानला जातो; मात्र सध्याची परिस्थिती त्याहून गंभीर असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा केवळ १७ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारकडूनही राज्याला अपेक्षित मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत फरक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हा मोर्चा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार असून, महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अधिवेशनात शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवरच चर्चा व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर प्रश्नचिन्ह
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत बोलताना रोहित पवार यांनी पारदर्शक तपासाची मागणी पुन्हा एकदा केली. आपण यापूर्वीही व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे सांगितले आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कंपनीला १६८ कोटी रुपये देण्यात आल्याची बाब समोर आल्याने काही प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रकरणात नेत्यांनीच उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, प्रवक्त्यांनी नव्हे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपघाताबाबत गुन्हा दाखल होऊन तपास पारदर्शकपणे व्हावा आणि तो जनतेला विश्वासार्ह वाटेल असा असावा, असे ते म्हणाले. अपघाताशी संबंधित तांत्रिक प्रश्न उपस्थित केले जात असताना त्यांची उत्तरे देण्याऐवजी व्हीएसआर कंपनीच्या कामकाजाचे समर्थन केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
या प्रकरणात आपल्यावर कितीही टीका झाली तरी आपण ती मनावर घेत नसल्याचे सांगत, अजित पवार यांना न्याय मिळवून देणे हेच आपले भावनिक कर्तव्य असल्याचे रोहित पवार म्हणाले. कर्नाटक सरकारने आपली झिरो एफआयआर नोंदवून घेतली असून, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनीही सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मेळघाटातील प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात घेण्याची मागणी
मेळघाटातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत बोलताना विकासाला आपला विरोध नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, कोणताही प्रकल्प राबविताना संबंधित ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अनेक प्रकल्पांची किंमत आणि सविस्तर माहिती घोषणा झाल्यानंतरच समोर येते, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात एआय सेंटरसारखा प्रकल्प होऊ नये, अशी आमची इच्छा असल्याचे सांगताना त्यांनी या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अधिक रोजगार निर्माण करणारे प्रकल्प गुजरातमध्ये आणि मोठ्या प्रमाणात पाणी वापरणारे प्रकल्प महाराष्ट्रात, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदार दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांवरही रोहित पवार यांनी भाष्य केले. आमच्या पक्षातील कोणताही आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात लोकप्रतिनिधी काम करत असून, त्यांचे पवार साहेबांशी भावनिक नाते आहे. त्यामुळे पक्षांतराच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
डी-लिमिटेशन विधेयकाबाबत विचारले असता, विधेयकाचा मसुदा अधिकृतपणे समोर आल्यानंतर त्याचे वाचन करून भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्याकडूनही याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर पक्षाची भूमिका मांडण्यात येईल, असे ते म्हणाले.
आनंदराज आंबेडकर यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची नाराजी
अजित पवार यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार आज हयात नसताना त्यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला. आनंदराज आंबेडकर यांना मोठा सामाजिक आणि कौटुंबिक वारसा लाभला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने त्या वारशाला साजेसे वर्तन दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. संबंधित वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली नसेल, तर महाराष्ट्रातील जनतेची आणि लोकांच्या भावनांची दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सिटी न्यूज | वस्तुस्थिती समाजहितासाठी!



