रामटेकच्या टिपूर पौर्णिमा उत्सवात यंदा रोषणाई नाही; ४४ वर्षांची परंपरा खंडित होणार!

पुरातत्त्व विभागाची लेखी परवानगी मिळूनही गड मंदिर परिसरात रोषणाई होणार नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी; निर्णयावर प्रश्नचिन्ह
रामटेक (अजय मेहरकुळे, सिटी न्यूज) : नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक गड मंदिर परिसरात टिपूर पौर्णिमेनिमित्त गेल्या ४४ वर्षांपासून सुरू असलेली आकर्षक रोषणाईची परंपरा यंदा खंडित होणार आहे. यंदाच्या उत्सवात गड मंदिर परिसरात रोषणाई करण्यात येणार नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रामटेक येथे टिपूर पौर्णिमेनिमित्त २३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर रोजी भव्य शोभायात्रा, २४ नोव्हेंबर रोजी टिपूर दहन, तर २५ नोव्हेंबर रोजी भव्य सांस्कृतिक मंडई आयोजित करण्यात आली आहे.
मात्र, या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली गड मंदिर परिसरातील रोषणाई यंदा होणार नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे, रोषणाईसाठी पुरातत्त्व विभागाकडून लेखी परवानगी मिळाल्याचे सांगण्यात येत असूनही प्रत्यक्ष रोषणाई होणार नसल्याने या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या ४४ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा यंदा का थांबवण्यात येत आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुरातत्त्व विभागाची परवानगी असतानाही रोषणाई न करण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
बाईट : राहुल कोठेकर, स्थानिक नागरिक
दरम्यान, टिपूर पौर्णिमा उत्सवातील पारंपरिक रोषणाईचा आनंद यंदा रामटेककरांना घेता येणार नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासन या विषयावर काय भूमिका घेते आणि ४४ वर्षांची परंपरा पुन्हा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



