बुलढाण्यात नोव्हेंबरमध्येच १६ गावांची तहान टँकरवर; उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता!

तीन तालुक्यांत १७ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा; २० गावांसाठी ३१ विहिरी आणि विंधनविहिरींचे अधिग्रहण
बुलढाणा (गजानन राऊत, सिटी न्यूज) : उन्हाळा सुरू होण्यास अद्याप काही महिने बाकी असतानाच बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण चित्र समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील १६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तीन तालुक्यांमध्ये तब्बल १७ खासगी टँकर सुरू असून, आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता दिसून येत आहे. या तालुक्यातील आठ गावांना सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तर सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यांमध्येही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.
२० गावांसाठी ३१ विहिरींचे अधिग्रहण
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासोबतच प्रशासनाने पाणीटंचाईवर उपाय म्हणून २० गावांसाठी ३१ खासगी विहिरी आणि विंधनविहिरींचे अधिग्रहण केले आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
उन्हाळ्यात २१९ गावांना टँकरची गरज भासण्याचा अंदाज
जिल्हा प्रशासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार आगामी उन्हाळ्यात तब्बल २१९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. गेल्या दशकात जिल्ह्यात टँकरची संख्या ८३ पर्यंत पोहोचली होती. यंदा ही संख्या त्याही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनासमोर पाणीटंचाईचे मोठे आव्हान
नोव्हेंबर महिन्यातच १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असेल, तर उन्हाळ्यात परिस्थिती किती गंभीर होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि पर्यायी उपाययोजना वेळेत राबविणे आवश्यक ठरणार आहे.
एकीकडे उन्हाळ्याला अद्याप सुरुवातही झालेली नाही, तर दुसरीकडे गावागावांत पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट प्रशासन कसे हाताळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



