AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

तारखेड्यातील प्राचीन बालाजी मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन; ५०० ते ७०० भाविकांनी घेतला लाभ

नांदुरकर वाड्यातील ऐतिहासिक मंदिरात सहाव्या पिढीकडून धार्मिक परंपरा जतन; भजन, कीर्तन, हरिपाठ आणि काल्याने भक्तिमय वातावरण

अमरावती : कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भाजी बाजार परिसरातील तारखेडा येथील गोड नांदुरकर वाड्यात असलेल्या प्राचीन बालाजी मंदिरातही पारंपरिक पद्धतीने महाप्रसाद सोहळा भक्तिभावात पार पडला.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरातन काळातील बालाजीच्या अष्टधातूच्या मूर्ती स्थापित आहेत. या मूर्तींचे वजन अंदाजे ५० ते १०० किलोपर्यंत असल्याचे सांगितले जाते. मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून नांदुरकर कुटुंबीयांकडून अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जपली जात आहे.

नांदुरकर कुटुंबाच्या सहाव्या पिढीकडून कार्तिकी महिन्यात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या धार्मिक सोहळ्याच्या आदल्या दिवशी भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भजनासह तीर्थकलश आणि काल्याचा कार्यक्रम पार पडतो.

धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाचा दरवर्षी अंदाजे ५०० ते ७०० भाविक लाभ घेतात.

अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा नांदुरकर कुटुंबीयांनी आजही श्रद्धेने जपली आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी शहरातील विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

या सोहळ्याच्या माध्यमातून धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि भक्तिभावाची भावना अधिक दृढ होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button