राजकमल रेल्वे पूल बंद होणार; पर्यायी मार्गच नाही!

दोन दिवसांत जयस्तंभ ते राजकमल चौक मार्गही बंद होणार; महारेलच्या कामामुळे अमरावतीकरांची वाहतूक कोंडीत होरपळ
१२५ कोटींच्या पुलाचे काम युद्धपातळीवर; पोलिसांना पूर्वसूचना न देताच मार्ग बंद केल्याचा आरोप, प्रशासनातील समन्वयाअभावी नागरिक त्रस्त
अमरावती : शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राजकमल चौकातील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रेल्वे स्टेशन ते हमालपुरा या पुलावरील मार्गाची वाहतूक मागील दोन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. आता येत्या दोन दिवसांत जयस्तंभ चौक ते राजकमल चौक हा दुसरा महत्त्वाचा मार्गही बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, एवढ्या महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक बंद करताना पर्यायी मार्गांची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

राजकमल चौकातील रेल्वे पुलाचे सुमारे १२५ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्बांधणीचे काम महारेलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कामासाठी पुलावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहे. यापूर्वी हमालपुरा ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग सुरू होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद करून पुलाचे पाडकाम वेगाने सुरू करण्यात आले आहे. संबंधित मार्ग बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय खताळे यांनी दिली.

शहरातील प्रमुख रस्ते किंवा वाहतुकीचे महत्त्वाचे मार्ग बंद करण्यापूर्वी पोलिस प्रशासनाला पूर्वसूचना देणे आवश्यक असते. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन आणि पर्यायी मार्ग निश्चित करणे अपेक्षित असते. मात्र, महारेलच्या अधिकाऱ्यांनी पोलिस यंत्रणेला विश्वासात न घेता रेल्वे स्टेशन ते हमालपुरा हा मार्ग बंद केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महारेल आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.
दोन दिवसांत दुसरा महत्त्वाचा मार्गही बंद!
रेल्वे स्टेशन ते हमालपुरा मार्ग बंद झाल्यानंतर आता जयस्तंभ चौक ते राजकमल चौक या पुलाच्या दुसऱ्या बाजूचे पाडकामही दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती महारेलच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. रेल्वे स्टेशनपासून बेलपुरा आणि चीचफाईलकडे जाणारा मार्गही बंद होण्याची शक्यता असल्याने नागरिकांसमोर प्रवासाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
पर्यायी मार्ग नाही, वाहतूक कोंडी अटळ!
राजकमल चौक ते इर्विन चौक हा परिसर शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. व्यापारी प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालये, बाजारपेठा आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत रेल्वे पुलाचे दोन्ही बाजूंचे मार्ग बंद झाल्यास संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आधीच शहरात विविध ठिकाणी वाहतुकीचा ताण असताना या मार्गांवरील बंदीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, मार्ग बंद करण्यापूर्वी नागरिकांना कोणत्या पर्यायी रस्त्याने जाता येईल, याची माहिती देणारे नियोजन अद्याप दिसून आलेले नाही. वाहनचालकांना ऐनवेळी दुसरा रस्ता शोधावा लागणार असून, यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीचा अपव्यय होणार आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पोलिस यंत्रणेची भूमिका काय?
या संपूर्ण प्रकरणात महारेल आणि प्रशासकीय यंत्रणेमधील समन्वयाचा अभाव नागरिकांच्या अडचणी वाढवणारा ठरत आहे. दुसरीकडे, शहरातील प्रमुख मार्ग बंद होण्याची माहिती असतानाही पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि वाहतूक निरीक्षक स्तरावर पर्यायी मार्गांचे नियोजन अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वाहतूक पोलिस यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
१२५ कोटींच्या विकासकामाचे नागरिकांकडून स्वागत होत असले, तरी कामाच्या नावाखाली शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू नये, ही अपेक्षा आहे. महारेलच्या अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने पर्यायी मार्ग जाहीर करावेत, वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करावेत आणि नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा राजकमल चौकापासून इर्विन चौकापर्यंतचा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.



