बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश; तपासासाठी पोलिसांची ‘स्पेशल ३०’ पथके तैनात!

आंतरजिल्हा बाळ विक्री प्रकरणाची व्याप्ती वाढली; तीन बालकांचा शोध सुरू, उद्या आरोपींची पीसीआर संपणार
महापालिकेकडे जन्म प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेची माहिती मागवली; भोजने मॅटर्निटी होममध्ये सीसीटीव्ही नसल्याचे उघड, पती प्रफुल्ल भोजनेनेही तयार केले होते दिशाभूल करणारे पत्र
अमरावती : शहरात उघडकीस आलेल्या आंतरजिल्हा बाळ विक्री रॅकेटचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला असून, या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी तब्बल ३० सदस्यांचे विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. मानवी तस्करी, लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत १८ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नवजात बालकांच्या विक्रीचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी तीन बालकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, अटक आरोपींची पोलिस कोठडी उद्या संपणार असल्याने तपासाच्या दृष्टीने पुढील कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘स्पेशल ३०’ पथकात ठाणेदार रवींद्र राजूलवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) समाधान वाठोरे, सहायक पोलिस निरीक्षक निरंजना उमाळे, उपनिरीक्षक मिलिंद हिवरे आणि ज्योती देवकते यांच्यासह २५ पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. डॉ. वैशालीच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्धा आणि अमरावती येथील दाम्पत्यांना विकण्यात आलेली दोन बालके आणि त्यांच्याकडे असलेल्या पालकांची माहिती पोलिसांनी मिळवली आहे. आता उर्वरित तीन बालकांचा शोध घेण्यासोबतच त्यांना ताब्यात घेणारे पालक आणि त्यांचे जैविक आई-वडील यांचा शोध सुरू आहे.
प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिस उपायुक्त शाम घुगे आणि सहायक पोलिस आयुक्त नयन आलूरकर हे स्वतः आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. तपासातील प्रत्येक बाबीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असून, बालकांची विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा, दलालांचे जाळे आणि संबंधितांची भूमिका उघड करण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.
प्रफुल्ल भोजनेने तयार केले होते दिशाभूल करणारे पत्र
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या साडेसतरा वर्षीय मुलीने स्वतःचे वय २० वर्षे सांगून दिशाभूल केल्याचा दावा करणारे पत्र डॉ. वैशाली हिचा पती प्रफुल्ल भोजने याने तयार करून दिल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मुलीने वयाबाबत चुकीची माहिती दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे नमूद करणारे हे पत्र डॉ. वैशाली राजापेठ पोलिसांकडे देणार होती. मात्र, त्यापूर्वीच भोजने दाम्पत्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या पत्रामुळे प्रकरणातील प्रफुल्ल भोजनेची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. पोलिस उपायुक्त शाम घुगे यांनी हे पत्र जप्त केले असून, त्यातील मजकूर आणि पत्र तयार करण्यामागील उद्देश याची चौकशी केली जात आहे. अल्पवयीन मुलीच्या वयाबाबतची बाब लपविण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.
जन्म प्रमाणपत्रांच्या नोंदी तपासणार; महापालिकेशी पत्रव्यवहार
बाळ विक्री रॅकेटमध्ये जन्म प्रमाणपत्रांचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता अमरावती महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे माहिती मागवली आहे. दलाल निर्मल सरदार याने नवजात बालकाची विक्री करण्यापूर्वी त्या बालकाचा जन्म डॉ. भोजने यांच्या मॅटर्निटी होममध्ये झाल्याची नोंद दाखवली. त्यानंतर अमरावती महापालिकेतून त्या बालकाचे जन्म प्रमाणपत्र काढण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. संबंधित जन्म प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केल्याचेही समजते.
या पार्श्वभूमीवर जन्म प्रमाणपत्र देण्याची अधिकृत प्रक्रिया नेमकी काय आहे, रुग्णालयाकडून जन्माची माहिती कोणत्या स्वरूपात सादर केली जाते आणि त्या नोंदींची पडताळणी कशी केली जाते, याबाबत महापालिकेकडून माहिती मागवण्यात आली आहे. विशेषतः गेल्या वर्षभरात भोजने मॅटर्निटी होममध्ये जन्मलेल्या किती बालकांची नोंद करण्यात आली आणि त्यापैकी किती बालकांना जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली, याची तपशीलवार माहिती पोलिसांकडून मागवली जात आहे.
मॅटर्निटी होममध्ये सीसीटीव्हीच नाही!
या संपूर्ण प्रकरणात भोजने मॅटर्निटी होममधील सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव ही अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. मॅटर्निटी होम आणि सोनोग्राफी सेंटरमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था बंधनकारक असतानाही संबंधित रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिला, प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, नवजात बालकांची हालचाल आणि संबंधित व्यवहार यांचे दृश्य पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, याच परिस्थितीचा फायदा घेत मागील १२ ते १३ वर्षांपासून बाळ विक्रीचा अवैध प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या कालावधीत नेमकी किती बालकांची विक्री झाली, याचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यासाठी रुग्णालयातील नोंदी, जन्म प्रमाणपत्रे, संबंधित पालकांची माहिती आणि दलालांमधील संपर्क यांची सांगड घातली जात आहे.
शहरातील सर्व मॅटर्निटी होमची तपासणी होणार?
भोजने मॅटर्निटी होममधील प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या अन्य मॅटर्निटी होम आणि सोनोग्राफी सेंटरच्या नोंदणी व तपासणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अशा संस्थांची नोंदणी कशी केली जाते, त्यांची नियमित तपासणी कोणत्या निकषांवर होते, सीसीटीव्हीची उपलब्धता तपासली जाते का आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई केली जाते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे.
दरम्यान, उद्या आरोपींची पोलिस कोठडी संपणार असल्याने पुढील तपासासाठी त्यांना पुन्हा कोठडी मिळविण्याबाबत पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, किती बालकांची विक्री झाली आणि या अवैध व्यवहारासाठी जन्म प्रमाणपत्रांच्या यंत्रणेचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, याची उत्तरे पुढील तपासातून समोर येण्याची अपेक्षा आहे.



