
२३ नोव्हेंबरला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते साडी अर्पण व पूजन; एकादशीनिमित्त तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन
अमरावती : विदर्भातील रुक्मिणी मातेचे माहेर आणि धार्मिक श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथे यंदा एकादशीनिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे वर्धा नदीला तब्बल २२१ मीटर लांबीची साडी अर्पण करण्यात येणार आहे. सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते साडी अर्पण व पूजनाचा धार्मिक विधी पार पडणार आहे.

रुक्मिणी मातेचे संस्थान मानल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी नदीला साडी अर्पण करण्याची परंपरा आणि धार्मिक भावनेला विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने कौंडण्यपूर येथे भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एकादशीच्या निमित्ताने तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य बोटिंग स्पर्धेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमुळे कौंडण्यपूर परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.
तीन दिवस भाविकांची मांदियाळी
दरवर्षी एकादशीच्या निमित्ताने कौंडण्यपूर येथे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक दाखल होतात. यंदाही २२१ मीटर साडी अर्पण सोहळा, नदीपूजन, बोटिंग स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यामुळे कौंडण्यपूरच्या धार्मिक पर्यटनाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.



