
जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर भररस्त्यात दादागिरी केल्याचा आरोप; वडगाव परिसरात वाहतुकीची कोंडी
यवतमाळ | दुर्गेश कान्हु
यवतमाळ : वाहनाला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील वडगाव परिसरात घडला. जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी चारचाकी वाहनचालक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजकडे जात असताना त्यांच्या वाहनाला एका चारचाकी वाहनाचा कट लागला. याच कारणावरून विद्यार्थ्यांनी चारचाकी वाहनचालकाशी वाद घातला. हा वाद पुढे वाढत जाऊन विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिक चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.
नागरिकांचा हस्तक्षेप; संभाव्य अनर्थ टळला
ज्येष्ठ नागरिकाला मारहाण होत असल्याचे लक्षात येताच वडगाव परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप केला. मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला विद्यार्थ्यांपासून बाजूला करत नागरिकांनी संबंधित विद्यार्थ्यांना जाब विचारला आणि समज दिली. नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. अन्यथा वाद आणखी चिघळण्याची शक्यता होती.
अवधूतवाडी पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे काही काळ आर्णी मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
शिक्षणाच्या मंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची रस्त्यावर दादागिरी?
वाहनाला कट लागला म्हणून थेट ज्येष्ठ नागरिकावर हात उचलण्याचा अधिकार कुणाला दिला? एखाद्या वाहतुकीच्या वादाचे निराकरण कायदेशीर मार्गाने करण्याऐवजी भररस्त्यात मारहाण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे वर्तन होत असल्याच्या आरोपामुळे जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिस्तीचा मुद्दाही चर्चेत आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर कॉलेज प्रशासन काय कारवाई करणार आणि या प्रकरणात अवधूतवाडी पोलीस कोणती भूमिका घेणार, याकडे आता यवतमाळकरांचे लक्ष लागले आहे.



