AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

अमरावती मनपाच्या कचरा वाहतुकीत ‘वजनाचा खेळ’? उपमहापौर सचिन भेंडे यांची अचानक धडक!

कचरा गाड्यांतून घरगुती कचऱ्याऐवजी बांधकामाचा मलबा वाहतूक; प्रतिटन देयक पद्धतीवरून गैरव्यवहाराचा संशय, चौकशीची मागणी होण्याची शक्यता

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक व्यवस्थेत कथित गैरव्यवहार होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. कचरा वाहतुकीच्या नावाखाली बांधकामाचा मलबा वाहून नेला जात असल्याचा प्रकार उपमहापौर सचिन भेंडे यांच्या अचानक तपासणीत समोर आला. बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक १८ मधील डीपीएस शाळेजवळ त्यांनी कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची पाहणी केली. यावेळी वाहनांमध्ये घरगुती कचऱ्याऐवजी बांधकामाचा मलबा आढळल्याने कचरा वाहतुकीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कचरा गाड्यांमध्ये बांधकामाचा मलबा!

उपमहापौर सचिन भेंडे यांनी अचानक घटनास्थळी भेट देऊन कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमधून बांधकामाचा मलबा वाहून नेला जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, परिसरातील नाल्यातील अडथळा दूर करण्यासाठी अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले होते. त्या बांधकामातून निघालेला मलबा वाहून नेण्याचे काम सुरू असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

प्रतिटन देयकामुळे ‘वजनाच्या खेळा’चा संशय

मात्र, या प्रकाराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महानगरपालिकेकडून कचरा वाहतुकीसाठी प्रतिटन वजनानुसार देयक अदा केले जात असल्याने बांधकामाचा मलबा वाहून नेण्याच्या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता उपमहापौर सचिन भेंडे यांनी व्यक्त केली. घरगुती कचऱ्याच्या वाहतुकीसाठी नियुक्त वाहनांचा वापर अन्य कामांसाठी होत असल्यास त्याचे स्वतंत्र लेखांकन आणि देयक कशा पद्धतीने केले जाते, हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

कचरा वाहतुकीच्या नावाखाली नेमके कोणत्या प्रकारचे साहित्य वाहून नेले जाते? बांधकामाचा मलबा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का? प्रतिटन वजनानुसार देयक देताना त्याची पडताळणी कोण करते? तसेच या प्रकरणात संबंधित कंत्राटदार किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

उपमहापौरांच्या अचानक तपासणीमुळे अमरावती महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून देयकांची तपासणी केली जाणार का आणि महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button