citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात ३ कोटी ७५ लाखांची जबरी चोरी; व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून रोकड लंपास!

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री थरार; तीन ते चार चोरट्यांनी वाहनासह रोकड पळवली, सीसीटीव्हीत घटना कैद

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये जबरी चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवत तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलीस त्या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश परमार हे व्यापारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या वाहनातून ३ कोटी ७५ लाख रुपयांची रोकड घेऊन जालन्याकडे जाण्याच्या तयारीत होते. याच वेळी तीन ते चार चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत व्यापाऱ्याला धमकावले आणि त्यांचे वाहन तसेच त्यामधील कोट्यवधी रुपयांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर चोरट्यांनी पळवून नेलेले वाहन कामठी येथील खैरी परिसरात आढळून आले. मात्र, वाहनाची तपासणी केली असता त्यातील संपूर्ण रोकड गायब असल्याचे समोर आले. त्यामुळे चोरट्यांनी नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेतील आरोपींची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून, आरोपींचा माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

या घटनेबाबत नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माहिती दिली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तपास करत आहेत. तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या रोकड चोरीच्या या घटनेने नागपूरच्या व्यापारी वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाईट : राहुल मदने, पोलीस उपायुक्त, नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button