नागपूर-मूल मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग; ३० ते ३५ प्रवाशांचे थरारक बचाव!

उमरेड-नागपूर महामार्गावरील चंपा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ दुर्घटना; महिला आणि बालकांसह सर्व प्रवासी सुखरूप, बस जळून खाक
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरहून मूलकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला सोमवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. उमरेड-नागपूर महामार्गावरील चंपा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली. आगीने काही क्षणांतच संपूर्ण बसला विळखा घातला आणि बस जळून पूर्णपणे खाक झाली. मात्र, प्रसंगावधान राखत बसमधील ३० ते ३५ प्रवाशांनी वेळीच खाली उतरून आपला जीव वाचवला. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची माहिती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली ट्रॅव्हल्सची खासगी बस (क्रमांक MH 12 KQ 1610) सोमवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता नागपूरहून मूलकडे जाण्यासाठी रवाना झाली होती. उमरेड मार्गे मूलकडे जात असताना सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास चंपा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ बसमध्ये अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.
प्रसंगावधानामुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले
बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि प्रवाशांनी तातडीने बस खाली करण्यास सुरुवात केली. महिला आणि लहान मुलांसह सर्व ३० ते ३५ प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले. प्रवासी बाहेर येताच आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतले. काही वेळातच बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच उमरेड अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आपत्कालीन यंत्रणांच्या कारवाईनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
या घटनेची पाचगाव पोलिसांनी दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाचगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी रविंद्र मानकर यांच्या देखरेखीखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पेट्रोल पंपाजवळ बसला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रवाशांनी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेने प्रवासी वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



