नागपुरात एमडी ड्रग्सविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोतवाली परिसरातून १३० ग्रॅम एमडी सदृश्य पावडर हस्तगत; दोघे आरोपी ताब्यात, सहा जणांचा शोध सुरू
नागपूर : नागपूर शहरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल परिसरात छापा टाकून पोलिसांनी १३० ग्रॅम एमडी ड्रग्स सदृश्य पावडर जप्त केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोबाईल फोन, मोपेड आणि इलेक्ट्रॉनिक वजन काट्यासह एकूण ५ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३.५० ते सकाळी ६.४० वाजेदरम्यान किल्ला महाल परिसरात, शिशु विकास शाळेमागे सुरेश बागल यांच्या घरासमोर ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत शेख मोहसीन अब्दुल गफूर (वय २८, रा. शिशु विकास शाळेमागे, किल्ला महाल) आणि शेख साकीब शेख आसिफ (वय २३, रा. तुळशीबाग, महाल) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी केलेल्या जप्तीत १३० ग्रॅम एमडी सदृश्य पावडरची किंमत ३ लाख ९० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, ९० हजार रुपये किमतीची बर्गमन मोपेड, ५०० रुपयांचा छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि झिपलॉक पन्नीचा साठा असा एकूण ५ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित आणखी सहा जणांचा सहभाग असल्याचा संशय असून, तरबेज आलम उर्फ टिपू उर्फ अंग्रेज, राहील सलाम शेख, नौशाद इम्रान मलिक, इरफान, शेख इकराम शेख मुजफ्फर आणि अमीन या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. हे सर्व संशयित नागपूर शहरातील विविध परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बिचेवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमुळे महाल परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, फरार संशयितांचा शोध आणि या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.



