citynewsFarmersCrisisMaharashtraNagpur

दुष्काळावर मात करण्यासाठी जलव्यवस्थापन आणि पीक नियोजनावर भर; २७ नोव्हेंबरपासून नागपुरात १७ वे अग्रोव्हिजन प्रदर्शन

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती तंत्रज्ञानाचे मिळणार मार्गदर्शन; ४५० कंपन्या आणि कृषी संस्थांचा सहभाग अपेक्षित, शेतकऱ्यांसाठी ३० मोफत कार्यशाळांचे आयोजन

नागपूर : बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होणारी आव्हाने आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने यंदाच्या १७ व्या अग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात जलव्यवस्थापन, पीक नियोजन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात येणार आहे. येत्या २७ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय परिसरात, अमरावती मार्गावर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर, कमी पाण्यात अधिक उत्पादन आणि शेतीपूरक व्यवसायांच्या संधी याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. अग्रोव्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अग्रोव्हिजनचे यंदा १७ वे वर्ष असून, दरवर्षी या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील बदल आणि उत्पादनवाढीच्या विविध संधींची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारतातील मोठ्या कृषी प्रदर्शनांमध्ये अग्रोव्हिजनने राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, दरवर्षी लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात.

यंदा शेतीसमोरील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पाण्याचा काटेकोर वापर, जलसंवर्धन, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, दुष्काळी परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत, फळबागांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

४५० कंपन्या आणि कृषी संस्थांचा सहभाग अपेक्षित

यंदाच्या प्रदर्शनासाठी तीन मोठे हँगर उभारण्यात येणार असून, मोठ्या कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या प्रदर्शनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नामांकित कृषी कंपन्या, कृषी संस्था, कृषी क्षेत्रातील उत्पादक, वितरक आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संस्थांचा सहभाग या प्रदर्शनात राहणार आहे. यंदा सुमारे ४५० नामांकित कंपन्या आणि कृषी संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी उपकरणे, यंत्रसामग्री, सुधारित तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींची प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे.

स्टार्टअप आणि एमएसएमईसाठी स्वतंत्र दालन

अग्रोव्हिजन २०२६ ला एमएसएमईची मान्यता मिळाली असून, यंदा स्टार्टअप, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कृषी क्षेत्रातील नवोन्मेषकांसाठी स्वतंत्र पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहे. यामध्ये कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि शेतीपूरक उद्योगांच्या संधी प्रदर्शित केल्या जातील. याशिवाय पीएमएफएमई योजनेशी संबंधित उद्योजक आणि लघुउद्योजकांनाही स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ३० मोफत कार्यशाळा

अग्रोव्हिजनच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले जाते. यंदाही एकूण ३० कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये दुष्काळी परिस्थितीत संत्रा बागांचे व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पशुसंगोपन, जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन, पाण्याचा योग्य वापर, जलव्यवस्थापनाच्या यशोगाथा आणि दुष्काळातील पीक नियोजन या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी पाण्यात फळबागा, ऊस आणि कापूस पिकांचे व्यवस्थापन कसे करता येईल, याबाबत कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून शेतीचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, याची माहितीही या कार्यशाळांमधून दिली जाणार आहे.

शेतीपूरक उद्योगांवरही विशेष लक्ष

शेतीतील उत्पन्नाला पर्यायी आधार मिळावा आणि शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावेत, यासाठी शेतीपूरक व्यवसायांवरही विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग, लघुउद्योग, आधुनिक कृषी उपकरणे आणि नव्या व्यवसाय संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कंपन्या, ग्रासरूट लेव्हल इनोव्हेटर्स, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स आणि चॅनल पार्टनर्स यांचाही प्रदर्शनात सहभाग राहणार आहे.

पत्रकार परिषदेला मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला अग्रोव्हिजन फाउंडेशनचे सदस्य सुधीर दिवे, विजय जाधव, कॅप्टन एल. बी. कलंत्री, अग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, समय कुलकर्णी, प्रशांत वासाडे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विजय इलोरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाची अधिक माहिती व सहभागासाठी संपर्क :

अग्रोव्हिजन सचिवालय, गोविंद अपार्टमेंट, शंकरनगर, नागपूर.

दूरध्वनी : ०७१२-२५५५२४९ / २५४४९२९

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button