
रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद; नागरिकांची घराबाहेर धाव, सुदैवाने जीवितहानी किंवा वित्तहानी नाही
बुलढाणा | प्रतिनिधी – गजानन राऊत
जळगाव जिल्ह्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. मलकापूर शहरासह जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील अनेक गावांमध्ये सकाळी सुमारे ९ वाजून १६ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाचे धक्के उत्तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये जाणवले. यासोबतच जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील काही भागांनाही भूकंपाचे सौम्य हादरे बसले.

अचानक जमीन हादरल्याची जाणीव होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर पडले, तर काही ठिकाणी नागरिकांनी एकमेकांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, या भूकंपामुळे बुलढाणा जिल्ह्यात कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून नागरिकांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
जळगावनंतर बुलढाणा जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सध्या जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.



