किराणा किटवरून राणा विरुद्ध पोटे संघर्षाला नवे वळण; प्रवीण पोटेंचा नाव न घेता रवींना टोला!

दिवाळीच्या मदतकार्यावरून अमरावतीत राजकीय फटकेबाजी; ‘मदत हृदयातून झाली पाहिजे, निवडणुकीच्या फायद्यासाठी नव्हे’ म्हणत पोटेंची अप्रत्यक्ष टीका
अमरावती : दिवाळीच्या निमित्ताने गरजूंना किराणा किट वाटप करण्यावरून अमरावतीच्या राजकारणात राणा विरुद्ध पोटे असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्याकडून गरजूंना किराणा किटचे वाटप केले जात असताना, दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात नाव न घेता रवी राणा यांच्या मदतकार्यावर निशाणा साधला. मदत ही मनापासून आणि हृदयातून झाली पाहिजे, निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी नव्हे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत विविध राजकीय पक्षांकडून मदतकार्य आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे. तर भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, या कार्यक्रमात प्रवीण पोटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मदतकार्याला राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना प्रवीण पोटे यांनी मदत करण्यामागील भावनेवर भाष्य केले. मदत ही केवळ प्रसिद्धीसाठी किंवा आगामी निवडणुकीत फायदा मिळावा या उद्देशाने नव्हे, तर ती मनापासून झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. इतकेच नव्हे, तर किराणा किटची बॅग अशी असावी की ती उचलताही येऊ नये, अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी टिप्पणी केली.
याशिवाय, ‘चारण्याचा माल आणि बाराण्याची पुंगी’ असा उल्लेख करत त्यांनी काही लोकांच्या कार्यपद्धतीवरही उपरोधिक टीका केली. या वक्तव्याचा रोख रवी राणा यांच्या किराणा किट वाटपाकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, पोटे यांनी आपल्या वक्तव्यात कोणाचेही नाव घेतले नाही.
एकीकडे राणा यांच्याकडून गरजूंना किराणा किटचे वाटप, तर दुसरीकडे पोटे यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम, अशा दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेली ही शाब्दिक फटकेबाजी केवळ मदतकार्याच्या पद्धतीवरची टीका आहे की राणा यांना उद्देशून दिलेला राजकीय संदेश, याबाबत अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता या टीकेला आमदार रवी राणा काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



