citynews

बँक खाते नसलेल्यांसाठीही पैसे पाठवणे-स्वीकारणे होणार सोपे; आरबीआयचे नवे नियम लागू!

डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सुविधेला नवे दिशानिर्देश; एका व्यवहारात १० हजार, तर महिन्याला २५ हजार रुपयांची मर्यादा, केवायसी आणि मोबाईल व्हेरिफिकेशन अनिवार्य

मुंबई : ज्यांच्याकडे स्वतःचे बँक खाते नाही, अशा नागरिकांसाठी पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे आता अधिक सुलभ होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डोमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात देशांतर्गत पैसे हस्तांतरणासंदर्भातील नियम एकत्रित करून नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्णयामुळे बँक खाते नसलेल्या नागरिकांनाही अधिकृत माध्यमातून पैसे हस्तांतरणाच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता लक्षात घेता केवायसी, मोबाईल क्रमांकाची पडताळणी आणि अतिरिक्त प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.

खाते नसलेल्यांनाही पैसे पाठविण्याची सुविधा

नवीन नियमांनुसार, स्वतःचे बँक खाते नसलेली व्यक्ती बँकेच्या शाखेत जाऊन एनईएफटीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या बँक खात्यात ५०० रुपयांपर्यंत रक्कम पाठवू शकते. याशिवाय, बँक खाते नसलेल्या नागरिकांसाठी कॅश पे-आउटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँक खातेधारक आपल्या खात्यातून अशा व्यक्तींना पैसे पाठवू शकतात. संबंधित लाभार्थ्यांना एटीएम, बिझनेस कॉरेस्पॉन्डंट (बीसी) एजंट किंवा इतर अधिकृत पेमेंट माध्यमांतून रोख रक्कम मिळवता येणार आहे.

एका व्यवहारासाठी १० हजारांची मर्यादा

कॅश पे-आउट सुविधेअंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कमाल १० हजार रुपये, तर एका लाभार्थ्यासाठी महिन्याला २५ हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे बँक खाते नसलेल्या नागरिकांनाही गरजेनुसार पैसे प्राप्त करणे शक्य होणार आहे.

केवायसी आणि मोबाईल व्हेरिफिकेशन बंधनकारक

नवीन दिशानिर्देशांनुसार, पैसे पाठविणाऱ्या बँका आणि बिझनेस कॉरेस्पॉन्डंटना रोख रक्कम जमा करणाऱ्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी ग्राहकाचा व्हेरिफाइड मोबाईल क्रमांक आणि स्व-साक्षांकित अधिकृत वैध कागदपत्रे (ओव्हीडी) घेणे आवश्यक असेल. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरण (एएफए) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

संशयास्पद व्यवहारांवर आरबीआयची नजर

आर्थिक फसवणूक आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बँका व पेमेंट ऑपरेटर्सना व्यवहारांची संख्या, गती आणि वारंवारता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर ग्राहकांना व्यवहाराचा अलर्ट पाठवणेही आवश्यक असेल. एखाद्या खात्यात किंवा खात्यांच्या समूहात अचानक असामान्य व्यवहार वाढल्याचे आढळल्यास त्याची तातडीने चौकशी केली जाणार आहे. संशयास्पद व्यवहारांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आरबीआयच्या या नव्या दिशानिर्देशांमुळे बँक खाते नसलेल्या नागरिकांना देशांतर्गत पैसे हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर केवायसी, प्रमाणीकरण आणि व्यवहारांवर देखरेख यांसारख्या उपाययोजनांमुळे डिजिटल तसेच रोख आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button