AMCActionAmravaticitynews

गर्ल्स हायस्कूल चौकात जलवाहिनीसाठी मोठा खड्डा; वाहतूक व्यवस्थेवर परिणाम!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; लवकरच पोलीस कुटुंबीयांना मिळणार पाणीपुरवठ्याची सुविधा

अमरावती : शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून, पाईपलाईन टाकण्यासाठी चौक परिसरात मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्ल्स हायस्कूल चौकातून गोल्डन किड्स शाळेच्या बाजूला असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीपर्यंत नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे. या वसाहतीमध्ये लवकरच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास येणार असल्याने आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे.

सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, वसाहतीतील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. मात्र, चौकातील मोठ्या खड्ड्यामुळे वाहतुकीचा मार्ग प्रभावित झाला असून, वाहनांची वर्दळ असलेल्या या परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीमध्ये लवकरच कुटुंबीयांचे वास्तव्य सुरू होणार असल्याने पाणीपुरवठ्यासह आवश्यक सुविधांची व्यवस्था करणे महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून खोदकाम केलेला रस्ता पूर्ववत करावा, अशी अपेक्षा वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button