Amravaticitynewslatestnewss breakingnews

भाऊबीजेसाठी बहिणींसह भावांनीही धरली गावाची वाट; अमरावती मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले!

माहेरी जाणाऱ्या बहिणींची लगबग; बहिणीला ओवाळणीसाठी भेटण्यासाठी भावांचाही प्रवास, ग्रामीण बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ

अमरावती : दिवाळीचा उत्साह आणि भाऊबीजेच्या सणाची ओढ यामुळे अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी जाणाऱ्या बहिणींसह आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या भावांनीही गावाची वाट धरली आहे. त्यामुळे बसस्थानकावरील फलाट प्रवाशांनी गजबजून गेले असून, सर्वत्र लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक विद्यार्थी आणि कुटुंबीय गावी जाण्यासाठी निघाले आहेत. तसेच नोकरी आणि व्यवसायानिमित्त अमरावती शहरात वास्तव्यास असलेले नागरिकही सण साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी रवाना होत आहेत. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या हातून ओवाळणी करून घेण्याची आणि भावाला औक्षण करण्याची परंपरा जपण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रवास सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. बस येताच प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण मार्गावरील बसमध्ये गर्दी अधिक जाणवत असून, बसस्थानकावरील फलाटांवर प्रवाशांची मोठी वर्दळ आहे.

दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणामुळे निर्माण झालेल्या या गर्दीत कुटुंबीयांसह प्रवास करणारे नागरिक, हातात सामान घेऊन बसची वाट पाहणारे प्रवासी आणि गावी जाण्याच्या आनंदात असलेले भावंडे असे उत्साहपूर्ण चित्र अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर पाहायला मिळत आहे. सणाचा आनंद, भावंडांच्या भेटीची ओढ आणि लालपरीच्या प्रवासाची प्रतीक्षा अशा वातावरणात अमरावती बसस्थानक सध्या प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button