citynewsJalnaMaharashtra

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिवाळी; लेकीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी!

जालन्यात शेतकऱ्याच्या घरी पोहोचून फराळाचा घेतला आस्वाद; संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिला धीर, मुलीच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा शब्द

जालना :

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली. सणाच्या आनंदापासून दूर असलेल्या शेतकरी कुटुंबाच्या घरी पोहोचत त्यांनी केवळ दिवाळीचा फराळ केला नाही, तर कुटुंबाच्या अडचणी जाणून घेत त्यांना आधारही दिला. विशेष म्हणजे, शेतकऱ्याच्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा शब्दही शिंदे यांनी दिला. त्यांच्या या भेटीने शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

मराठवाड्यात यंदा पावसाअभावी अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, कोरडी पडलेली पिके, आर्थिक अडचणी आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या दिवाळीवरही निराशेचे सावट पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत दिवाळीचा सण साजरा केला.

शिंदे यांच्या आगमनाने कुटुंबीय भावूक झाले. घरातील माऊलीने औक्षण करून त्यांचे आपुलकीने स्वागत केले. कोणताही औपचारिकपणा न ठेवता शिंदे यांनी थेट शेतकऱ्याच्या मातीच्या अंगणात बसून कुटुंबीयांसोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधत शेतीची परिस्थिती आणि कुटुंबाच्या अडचणी जाणून घेतल्या.

संवादादरम्यान शेतकऱ्याने कोरडी पडलेली पिके, थकीत कर्ज आणि पुढील काळातील आर्थिक संकट याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्याच्या अडचणी ऐकून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “आभाळ फाटलं तरी हे सरकार तुमच्या पाठीशी आहे,” अशा शब्दांत कुटुंबाला धीर दिला. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लेकीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा शब्द!

या भेटीदरम्यान शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाचा विषय समोर आला. मुलीला भविष्यात मेडिकल किंवा सीईटीसारख्या प्रवेश परीक्षांद्वारे उच्च शिक्षण घ्यायचे असल्याचे समजल्यानंतर शिंदे यांनी तिच्या शिक्षणाबाबत विशेष आस्था दाखवली. तिने कोणतीही चिंता न करता आपले शिक्षण सुरू ठेवावे, तिच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च आणि जबाबदारी आपण स्वतः स्वीकारू, असा शब्द त्यांनी दिला.

दुष्काळ, आर्थिक संकट आणि शेतीच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट दिलासा देणारी ठरली. विशेषतः मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याच्या आश्वासनामुळे कुटुंबाच्या मनातील भविष्याची चिंता काहीशी हलकी झाली. सत्तेच्या औपचारिकतेपलीकडे जाऊन शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याच्या या भेटीची चर्चा आता राज्यभर होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button