शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, शेतमजुरांना २५ हजारांची मदत द्या; रोहित पवारांची मागणी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची नांदेडमध्ये भेट; कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, चार मुलींच्या शिक्षणाची आमदार प्रताप पाटील यांनी घेतली जबाबदारी
नांदेड, प्रतिनिधी : मनोज मंनपूर्वे
राज्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी. तसेच फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जावरील एक वर्षाच्या व्याजाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार यांनी नांदेडमधील येळेगाव येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. संबंधित कुटुंबातील सदस्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले असून, काही कंपन्यांनी कर्ज माफ केले असले तरी काहींची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. याबाबत रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून एका फायनान्स कंपनीचे कर्ज तातडीने माफ करण्याची मागणी केली.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे वडील आजारी असून अंथरुणाला खिळलेले आहेत. कुटुंबावर सुमारे साडेचार लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी गंभीर बनल्या आहेत. दरम्यान, आमदार प्रताप पाटील यांनी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, मुलींना शिक्षणासाठी पाठवायचे की नाही, याचा अंतिम निर्णय त्यांच्या आईवर सोपवण्यात आला आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लाच मागणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा!
या भेटीदरम्यान ग्रामसेवकाने संबंधित कुटुंबाकडे घरासंदर्भातील कागदपत्रांसाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. आत्महत्येमुळे आधीच उघड्यावर आलेल्या कुटुंबाकडे पैसे मागणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुढील तीन दिवसांत त्या ग्रामसेवकाला निलंबित केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. अशा परिस्थितीतही त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे मागायला ग्रामसेवकाला लाज वाटत नसेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा!
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरही रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
“पाच हजार रुपये देण्यापेक्षा एक लाख रुपये प्रतिहेक्टर मदत जाहीर करा. शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्या. ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना अद्याप पाच हजार रुपये मिळालेले नाहीत. केवळ घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मदत करायची नाही, हा सरकारचा दिखावा आहे,” अशी टीका त्यांनी केली.
ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात असून अनेकांना दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले आहे. कर्जमाफी रखडली आहे, नवीन कर्ज मिळत नाही आणि फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा बोजा वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
MPSC पदभरतीचे श्रेय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना!
MPSC पदभरतीबाबत बोलताना रोहित पवार यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गट-कची १८ हजार पदे भरण्याची आमची मागणी होती. सरकारकडून १६ हजार पदांची भरती काढली जात असेल, तर ही चांगली बाब आहे. मात्र, या निर्णयाचे श्रेय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
गट-बसोबत गट-कची पदभरती, तहसीलदारांची किमान ५०० पदे आणि इतर मागण्याही मान्य व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकारी संस्थांमध्ये सरकारी संचालक नेमण्याच्या निर्णयावर टीका
सहकारी संस्थांवर सरकारचे अधिकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयालाही रोहित पवार यांनी विरोध केला. निवडणुकीच्या माध्यमातून सदस्य निवडून येत असताना सरकारने अधिकारी नियुक्त करणे हा लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातील निर्णय असल्याची टीका त्यांनी केली.
गोकुळ संस्थेच्या अध्यादेशाचा संदर्भ देत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. या निर्णयाविरोधात ९ नोव्हेंबर रोजी नागपुरात मोठे आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादांची परिवार एकत्र ठेवण्याची इच्छा दाबली गेली?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांची परिवार एकत्र ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही इच्छा दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांच्या अपघाताबाबतही सत्य समोर आले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
अशोक चव्हाण आता तीन तालुक्यांचे नेते – रोहित पवारांचा टोला
अशोक चव्हाण यांनी शेतकरी कुटुंबाची भेट घेतल्याबाबत बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण राज्यपातळीवर नेतृत्व करत होते; मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची राजकीय ताकद कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
“भाजपसोबत जो जातो, त्याची ताकद संपवली जाते. अशोक चव्हाण आता राज्याचे नव्हे, तर तीन तालुक्यांचे नेते राहिले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्या असून, त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल, अशी माहितीही रोहित पवार यांनी दिली.
शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत, ग्रामसेवकावर कारवाई, शेतकरी-शेतमजुरांना भरीव मदत आणि सहकारी संस्थांच्या अध्यादेशाविरोधातील आंदोलन अशा विविध मुद्द्यांवर रोहित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. आता त्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.



