AmravatiBadneracitynewsLatest NewsMaharashtra

रवी राणा-नवनीत राणांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम! बडनेऱ्यात गरजू कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वाटप

गेल्या २० वर्षांपासून दिवाळीचा आनंद गरजूंसोबत साजरा करण्याची परंपरा; संपूर्ण बडनेरा विधानसभा मतदारसंघात तीन लाख किराणा किट वाटपाचा उपक्रम

बडनेरा, प्रतिनिधी : दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरजू कुटुंबाची चूल थंड राहू नये, या सामाजिक भावनेतून आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून यंदाही दिवाळीनिमित्त किराणा किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून, बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गरजू कुटुंबांना दिवाळीच्या सणासाठी किराणा साहित्याचे वाटप केले जात आहे.

याच उपक्रमांतर्गत बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्याध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना किराणा किटचे वितरण करण्यात आले. निर्मला नगर, चंद्रनगर, राहुल नगर आणि टिळक नगर यांसह परिसरातील विविध वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन लाभार्थ्यांपर्यंत किराणा किट पोहोचविण्यात आले.

विशेष म्हणजे, यंदा संपूर्ण बडनेरा विधानसभा मतदारसंघात तब्बल तीन लाख किराणा किट वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आनंदाने सहभागी होता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

वीस वर्षांची परंपरा; गरजूंच्या घरात दिवाळीचा आनंद!

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांना मदतीचा हात देऊन त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, या भावनेतून रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे.

यावेळी सुनील राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक तथा गटनेते नाना आमले यांनी सिटी न्यूजशी संवाद साधताना या उपक्रमामागील सामाजिक भूमिका स्पष्ट केली. गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात मदत मिळावी आणि त्यांच्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, हीच आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग

या किराणा किट वाटप कार्यक्रमाला युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक तथा गटनेते नाना आमले, संदीप कांबळे, भुरू मारवे, संजय करिहार, किरण अंबाळकर, मधुकर निकोरे, कैलास संगते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला हा उपक्रम केवळ किराणा साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून, गरजू कुटुंबांशी आपुलकीचे नाते जोडण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे बडनेरा परिसरातील गरजू कुटुंबांना सणाच्या काळात मदतीचा आधार मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button