Amravati Gramincitynewslatestnewss breakingnews

तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुदेव अनुयायांचे आत्मक्लेश आंदोलन; वादग्रस्त विधानावरून मोझरीत संताप!

युवकांच्या आंदोलनाला ‘अराजक’ संबोधल्याने वाद चिघळला; गुरुदेव सेवा मंडळाने लेखी व व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागावी, यासह तीन प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांकडून पुढे.

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या मोझरी येथील गुरुकुंजमध्ये एका वादग्रस्त विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. युवकांच्या आंदोलनाला मौन श्रद्धांजली निवेदनात ‘अराजक’ संबोधण्यात आल्याने गुरुदेव अनुयायी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुदेव अनुयायांकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मोझरीतील वातावरण चर्चेचा विषय ठरले आहे.

या आत्मक्लेश आंदोलनात माजी आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांच्यासह साहित्यिक, लेखक आणि गुरुदेव अनुयायी सहभागी झाले होते. वादग्रस्त विधानामुळे गुरुदेव विचारांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी तीन महत्त्वपूर्ण मागण्या पुढे ठेवल्या आहेत. पहिली म्हणजे, युवकांच्या आंदोलनाला अराजक संबोधणाऱ्या वादग्रस्त विधानाबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने लेखी स्वरूपात माफी मागावी. तसेच गुरुदेव टीव्हीच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसिद्ध करून जाहीर माफी द्यावी.

दुसरी मागणी म्हणजे, गुरुकुंज येथील सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर आणि पुण्यतिथी महोत्सवाच्या मंचावर दरवर्षी सर्वधर्मांची प्रतीके लावण्यात यावीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांचे प्रतिबिंब या उपक्रमातून दिसावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

तिसऱ्या मागणीत सर्वधर्मीय प्रार्थना संबंधित धर्माच्या धर्मगुरूंकडून त्यांच्या धर्मातील रीतिरिवाज आणि परंपरेनुसार घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वधर्मसमभावाचा संदेश केवळ विचारांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष आचरणातही दिसावा, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला आहे.

दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा केंद्रबिंदू असलेल्या गुरुकुंजमध्येच सर्वधर्मसमभाव आणि आंदोलनकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या तीन मागण्यांवर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ काय भूमिका घेते आणि या वादावर तोडगा कधी निघतो, याकडे गुरुदेव अनुयायांसह मोझरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बाईट :

  • अमोल मिटकरी – माजी आमदार
  • चंद्रकांत वानखडे – ज्येष्ठ पत्रकार
  • प्रशांत कांबळे – गुरुदेव सेवक
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button