citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

गंभीर रुग्णाला आधी तपासल्याने डॉक्टरांवर हल्ला; कॉलर पकडून खाटेवर ढकलले, ठोसेही मारले!

मेयो रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील धक्कादायक प्रकार; निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांना मारहाण केल्याचा आरोप, हल्लेखोर पोलीस कर्मचारी असल्याची माहिती; तहसील पोलिसांत तक्रार दाखल.

नागपूर : रुग्णालयात गंभीर अवस्थेतील रुग्णाला प्रथम उपचार देण्याचा निर्णय घेतल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेयोमध्ये घडली. बुधवारी (ता. ४) दुपारी रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात हा प्रकार घडला. डॉ. समीर चांदेकर यांची कॉलर पकडून त्यांना खाटेवर ढकलण्यात आले, तसेच ठोसे मारून मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हल्ला करणारे संबंधित रुग्णाचे नातेवाईक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेयो रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात एका रुग्णाची तपासणी सुरू असतानाच दुसरा गंभीर अवस्थेतील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. दोन्ही रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांनी अधिक गंभीर असलेल्या रुग्णाला प्राधान्य देत त्याची तपासणी सुरू केली. वैद्यकीयदृष्ट्या गंभीर रुग्णाला तातडीने उपचार मिळणे आवश्यक असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतला होता.

मात्र, आपल्या रुग्णाची तपासणी आधी का केली जात नाही, असा सवाल करत दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘आमच्या रुग्णाला आधी तपासा, त्यानंतर दुसऱ्या रुग्णाकडे लक्ष द्या,’ असा आग्रह त्यांनी धरला. डॉक्टरांनी गंभीर रुग्णाला प्रथम उपचार देण्याची भूमिका स्पष्ट केली असतानाही नातेवाईकांचा संताप वाढत गेला.

वादाचे रूपांतर काही क्षणांतच मारहाणीत झाले. संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ केली, त्यांची कॉलर पकडून खाटेवर ढकलले आणि ठोसे मारल्याचा आरोप आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी रुग्णसेवा बजावणाऱ्या डॉक्टरावरच हल्ला झाल्याने वैद्यकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मेयोचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांनी तातडीने दखल घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे यांनी या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. तसेच निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनेही संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, रुग्णाच्या प्रकृतीनुसार उपचारांना प्राधान्य देणे ही डॉक्टरांची वैद्यकीय जबाबदारी असताना अशा प्रकारे डॉक्टरांवर हात उचलण्याच्या घटनांमुळे रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी तहसील पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

पोलीस संदर्भ : संजय मेंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसील पोलीस ठाणे, नागपूर.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button