सावनेरमध्ये दोन दुचाकींची जोरदार धडक; तिघे जखमी

हेटी परिसरातील नासिर ढाब्याजवळ अपघात; एकाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविले
नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेटी परिसरात नासिर ढाब्याजवळ दोन दुचाकींची धडक होऊन तिघे जखमी झाले. २३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका जखमीची प्रकृती लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात हिरालाल उईके, साहिल उईके आणि किशोर पोगडे हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली.
हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून तिन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. किशोर पोगडे यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे परिसरात काही काळ हालचाल वाढली होती.



