अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात! पाच जिल्ह्यांत शिक्षकांचा उत्साह

८१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू; ३५ हजार ८१० मतदार बजावणार मतदानाचा हक्क
अमरावती | सिटी न्यूज
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अमरावतीसह विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शिक्षक मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच शिक्षक आणि शिक्षिकांची गर्दी दिसून येत आहे.
पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रे
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण ८१ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५ हजार ८१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
मतदान केंद्रांबाहेर राजकीय हालचालींना वेग
अमरावती शहरातील विविध मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांची वर्दळ पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर उभारण्यात आलेल्या बूथवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सक्रिय दिसून येत आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महायुती तसेच अपक्ष उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सक्रिय असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या दिवशी ड्राय डे
मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी मतदानाच्या दिवशी ड्राय डे घोषित केला आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, प्रशासनाकडून प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.
कोणाच्या पारड्यात पडणार शिक्षकांचा कौल?
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षक मतदार कोणत्या उमेदवाराला पसंती देतात, याकडे राजकीय पक्षांसह विविध शिक्षक संघटनांचे लक्ष लागले आहे. मतदानाची टक्केवारी आणि उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सिटी न्यूज | अमरावती



