
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; ८ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन, १५ दिवसांची मुदत
मेहकर, बुलढाणा : मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावर डिव्हायडर बसविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले विजय पवार यांचे आमरण उपोषण अखेर १५ ऑक्टोबर रोजी मागे घेण्यात आले. आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, डिव्हायडरचा प्रश्न निर्धारित मुदतीत मार्गी न लागल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावर डिव्हायडर बसविण्यात यावेत, या मागणीसाठी डिव्हायडर संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय पवार यांनी ११ ऑक्टोबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यावरील सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी सुरुसे मेहकर येथे दाखल झाले. डिव्हायडर उभारणीसंदर्भातील प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीनंतर विजय पवार यांनी १५ ऑक्टोबर रोजी उपोषण मागे घेतले.
डिव्हायडरचा प्रश्न केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष मार्गी लागावा, अशी भूमिका विजय पवार यांनी घेतली आहे. पुढील पंधरा दिवसांत डिव्हायडरचा प्रश्न निकाली न निघाल्यास आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
आता एमएसआरडीसी आणि संबंधित प्रशासनाकडून या मागणीवर काय कार्यवाही होते, याकडे मेहकरकरांचे लक्ष लागले आहे. डिव्हायडरच्या मागणीला आश्वासन मिळाले असले, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.



